चार एक्के आणि एक जोकर
चार एक्के आणि एक जोकर
सृष्टीज्ञान संस्थेने २७ जून २०२० हा दिवस जागतिक सूक्ष्म जीवसृष्टी दिन म्हणून ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. सृष्टीज्ञान संस्थेची अशा पद्ध्तीने काम सुरु करण्याची ही पहिलीच वेळ होती. सृष्टीज्ञानचा टेक्नोक्रॅट तन्मय मांजरेकर याने झुनझुनवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापक अनिल आव्हाड सरांच्या मदतीने सूक्ष्म जीवसृष्टी विषयावरील मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नमंजुषा तयार केली. या प्रश्नमंजुषेमध्ये आपल्यापैकी ११३० जणांनी भाग घेतला. आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार !!
याशिवाय आणखी एक उल्लेखनीय ऑनलाईन उपक्रम सृष्टीज्ञानतर्फे घेण्यात आला. मुंबईतील गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूलच्या जवळजवळ ३५० विद्यार्थ्यांबरोबर जागतिक सूक्ष्म जीवसृष्टी दिनानिमित्त ऑनलाईन संवाद आयोजित करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या ऑनलाईन गुगल मीट या प्लॅट्फॉर्मवर येऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसमोर सूक्ष्म जीवसृष्टीचे महत्त्व या विषयावर सादरीकरण झाले. अनेक मुलामुलींनी सूक्ष्म जीवसृष्टीचे आपल्या जीवनातील स्थान यावर पोस्टर काढून सादर केली. काही जणांनी यावर इंग्रजीतून कविताही सादर केल्या. मुलांच्या मनातील जीवाणू, विषाणूंबाबतचे कितीतरी प्रश्न चर्चिले गेले.
या संपूर्ण उपक्रमावर उल्लेखनीय प्रभाव होता तो प्रज्ञाबोधिनीचे इयत्ता नववीचे चार विद्यार्थी, रुची शाह, मन मोरे, सुमन गिरी आणि वेदांत गोलतकर तसेच सृष्टीज्ञानतर्फे इस्क्रा शिंदे या पाच जणांचा ! अत्यंत शास्त्रीय तरीही सहजसंवादी पद्धतीने या पाच जणांनी सर्वांसमोर सूक्ष्म जीवसृष्टीचे विश्व स्लाईड आणि फिल्म्सच्या माध्यमातून उलगडून ठेवले. यामध्ये, सूक्ष्म जीवसृष्टीचे जगाला सर्वप्रथम दर्शन घडवणा–या अंतोन व्हान लिव्हेंहॉक या सूक्ष्मदर्शक यंत्राच्या शोधकर्त्यापासून ते आताच्या कोरोना विषाणू संसर्ग महामारीपर्यंतचा प्रवास सादर केला.
सृष्टीज्ञान संस्थेचा पहिलाच ऑनलाईन उपक्रम अशा पद्धतीने यशस्वी झाल्याबद्दल वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर आयुष्यात पहिल्यांदाच पत्त्याचा खेळ खेळणा-या भिडूला वाटपात चारही एक्के आणि एक जोकर मिळाला तर तो डाव जिंकणारच की !!!










