Donation
Recent Events

दरड मुक्त सह्याद्री अभियान

Published on August 17, 2022 under Uncategorized
दरड मुक्त सह्याद्री अभियान
रविवार दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी सृष्टीज्ञान संस्था मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने “दरड उत्पात आणि पुराचे संकट” या विषयावर आंगवली पंचक्रोशीतील सरपंचांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी श्री. संजीव अणेराव यांनी अणेराव अॅग्रो फार्म, मारळ येथे सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या संपूर्ण जगाला ग्रासलेल्या समस्यांचे पडसाद कोकणातही अनुभवायला मिळत आहेत. अनियमित पाऊस, ढगफुटी, पूर, वादळांची वारंवारिता अशा आपत्ती नित्याचा भाग होऊन गेल्या आहेत. अगदी या वर्षी सुद्धा जूनच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या तौक्ते वादळाने कोकणची दाणादाण उडवून दिली. २१, २२ आणि २३ जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने कोकणात दाखवलेले निसर्गाचे रूप खूपच भयावह होते. मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या दरडी, नद्यांचे बदललेले प्रवाह यांनी सारे होत्याचे नव्हते करून टाकले. प्रचंड नुकसान झाले. आंगवली पंचक्रोशीतील बाव नदीही याला अपवाद नव्हती. आंबा घाटातील कळक दऱ्यातून वर जाताना पाहिलेला दरड उत्पात धडकी भरवणारा होता. यासाठी जेष्ठ पर्यावरण तज्ञ श्री. संजीव अणेराव यांच्या पुढाकाराने दरड उत्पाताची कारणे समजून घेणे त्यावर उपाय योजना आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला चिपळूण-संगमेश्वर या भागातील आमदार श्री. शेखर निकम हे मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृष्टीज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रशांत शिदे यांनी केले. एखाद्या खंबीर आणि साहसी व्यक्तीला सह्याद्रीची उपमा दिली जाते. आपल्या सगळ्यांचे आवडते शिवाजी महाराज आणि सह्याद्री यांना वेगळे करणे शक्यच नाही. असा सह्याद्री ज्याची जैविविधता संपूर्ण जगातील नकाशात ठळकपणे अधोरेखित केली आहे. अशा सह्याद्रीच्या कडांना भेगा पडायला लागल्या आहेत तेव्हा त्याची कारणे समजून घेणे खूप आवश्यक आहे. स्थानिक वृक्ष प्रजातींसह सरसकट होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीने सह्याद्रीचे डोंगर उघडे पडले आहेत. सुपीक माती वाहून चालली आहे, त्यामुळे नद्यांची पात्र उथळ होत आहेत आणि पुराचे संकट वाढत आहे. स्थानिक वन वृक्षांच्या मुळांचे जाळे नष्ट झाल्यामुळे माती आणि दगड बांधून ठेवणारी निसर्गाची रचनाच उध्वस्त झाली आहे. परिणामतः सह्याद्रीच्या कुशीत दरड कोसळण्याच्या घटना सतत वाढत आहेत. त्यामुळे जीवित आणि वित्त हानी व शेतीचे नुकसान सोसावे लागत आहे. सतत खचणा-या डोंगर आणि दगडांचा उत्पात सबंध गाव गाडून टाकतो ह्या घटना खूप मोठी चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत कृती करण्या साठी या विषयाला लवकरात लवकर हात घालणे ही काळाची गरज आहे. आपापल्या परिसरात शास्त्रीय पद्धतीने स्थानिक वन वृक्ष लागवड करुन आणि दीर्घकाळ त्यांचे संवर्धन करुन हे संकट दूर होऊ शकते. यात सृष्टीज्ञान मुख्यत: बांबूच्या लागवडीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. अशा प्रकारच्या निसर्ग संवर्धनातून जीवित हानी रोखण्याबरोबर आर्थिक समृद्धी सुद्धा शक्य आहे. हे लक्षात घेऊन सृष्टीज्ञान संस्था “दरडमुक्त सह्याद्री अभियान” सुरु करीत आहे. त्यादिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे आंगवलीतील श्री. अशोक अणेराव यांनी स्थानिक प्रजातींच्या लागवडीसाठी त्यांच्या मालकीची जमीन देऊ केली आहे. या बैठकीची सुरुवातच मुळी अशा संयुक्त वनप्रबंधन योजनेच्या करारनाम्याने झाली. सृष्टीज्ञान संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय जावळेकर आणि श्री. अशोक अणेराव यांनी या करारनाम्यावर स्वाक्षरी केली आणि त्याच्या प्रति आमदार श्री. शेखर निकम यांनी त्यांना प्रदान केल्या.
कासार कोळवणचे पोलिस पाटील श्री. महेंद्र करंबेळे यांनी त्यांच्या गावाला भोगाव्या लागलेल्या पूर परिस्थिती बद्दल सांगितले. बाव नदीला आलेल्या पुरात आंगवलीशी जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. नदी पात्रात होणारे वाळूचे उत्खनन हेही पुराचे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले. त्यांची स्वत:ची बांबूची नर्सरी असून त्यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड केली आहे. त्या भागाला पुराचा तडाखा कमी बसला आहे. सृष्टीज्ञान करत असलेल्या बांबू लागवडीच्या कार्यक्रमात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीला संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती श्री. जयसिंग माने हेही उपस्थित होते. त्यांनी पंचायत पातळीवर दरड उत्पताचा सामना करण्यासाठी संपूर्ण मदत करण्याची तयारी दर्शवली.
तर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण मधिल तिवरे गावातील बांबूच्या बेटांमुळे दरड उत्पतातून वाचलेली घरे मी डोळ्याने पाहून आलो आहे. मातीची धूप आणि दरड उत्पात रोखण्यासाठी बांबू सारख्या स्थानिक प्रजातींची लागवड हाच सर्वोत्तम उपाय आहे असे सांगितले. त्यांच्या हस्ते बांबूच्या रोपांचे वृक्षारोपण करून दरड मुक्त सह्याद्री अभियानाची सुरुवात झाली. सृष्टीज्ञान संस्थेच्या या कामात लागेल ती सर्व शासकीय तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सह्याद्री संकल्प सोसायटीचे सचिव डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी भविष्यात आपल्या पुढच्या पिढीच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले हे आपल्याला सांगता आले पाहिजे या वाक्यावर समारोप आणि आभार प्रदर्शन केले. या बैठकीला आंगवली पंचक्रोशीतील १५ गावातील सरपंच तसेच पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यांनीही त्यांच्या गाव पातळीवर दरड उत्पात रोखण्यासाठी आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करू आणि त्यानुसार कृती आराखडा ठरवू असे सांगितले. बैठकीत सहभागी सरपंच आणि पंचायत सदस्यांना बांबूचे रोप भेट म्हणून देण्यात आले.
ही बैठक यशस्वीपणे पर पाडण्यासाठी सृष्टीज्ञान, संस्था मुंबई; सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या सहयोगी शुभचिंतकानी तसेच वनालिकाच्या व्यवस्थापकांनी अपार मेहनत घेतली होती.
No photo description available.
May be an image of text that says 'दरडमुक्त सह्याद्री अभियान दरड उत्पात आणि पुराचे संकट कारण आणि निवारण- विचारमंथन नियोजन बैठक प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री. शेखर निकम माननीय (सभापती, संगमेदूर (आमदार, चिपळूण संगमेश्वर विधानसभा) माननीय श्री. संजीव अणेराव (जेष्ठ पर्यावरण तज्ज) संकल्य आयोजक: सृष्टी्ञान संस्था, मुंबई आणि'
May be an image of one or more people, people sitting and people standing
No photo description available.