Donation
Recent Events

न्याहारी उत्तम, आरोग्य सर्वोत्तम!

Published on August 17, 2022 under Uncategorized
न्याहारी उत्तम, आरोग्य सर्वोत्तम!
सप्टेंबर हा पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गेले महिनाभर पोषण म्हणजे काय याबद्दल मी लेख लिहीत होते. याची सांगता आज होत आहे. २०२१ च्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम “feeding smart right from start” म्हणजेच “सुयोग्य आहाराची सुरुवात, एका वर्षाच्या आत” अशी आहे. त्यानुसार महिलांसाठी “Nutritious Breakfast, for the day to start अर्थात न्याहारी उत्तम, आरोग्य सर्वोत्तम” ही संकल्पना घेऊन देवरुख परिसरातील महिलांसाठी “हवामान पूरक सकस न्याहारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एका उत्साह वर्धक दिवसाची सुरुवात ही नेहमी पोषक आणि सकस न्याहारीने होत असते. अशी न्याहारी जी संपूर्ण दिवसभर काम करण्याची ताकद तुम्हाला देऊ शकते. याकडे अनेकदा महिलांचे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे महिलांमधील कुपोषण वाढत जाते. याबाबत महिलांमध्ये जागृती करण्यासाठी हवामान पूरक, स्थानिक, सकस आणि ताजे न्याहारीचे विविध प्रकार महिलांना कळावे आणि त्यांच्या पोषण मूल्यांबाबत माहिती व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केले होते. कासार कोळवण, मारळ आणि आंगवली या गावांमधिल एकूण एकशे वीस महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हा उपक्रम महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी या गावांच्या महिला सरपंच श्रीम. मानसी करंबेळे, श्रीम. मंगला गुरव आणि श्रीम. अरुणा अणेराव यांनी विशेष प्रयत्न केले.
सकाळी उठल्यावर एक तासाच्या आत न्याहरी करणे आवश्यक आहे. सात तासांची झोप आणि जेवून १० तास झाल्यानंतर दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी एक सकस न्याहरी करणे गरजेचे आहे. त्यातही हि न्याहरी प्रथिने केंद्रित असावी. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि पुनः कार्यरत होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती प्रामुख्याने प्रथिनांमधून मिळत असते. त्याव्यतिरिक्त शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच, अन्नाचे पचन, पोषण, प्राणवायू मुळे ऊर्जा निर्माण होणे, रक्त गोठणे, विविध अणू-रेणूना निष्प्रभ करणे, स्नायूंचे आकुंचन-प्रसरण यासारख्या क्रिया वेगाने व्हाव्यात यासाठी काम करणाऱ्या एन्झाईम्ससाठी प्रथिनांची आवश्यकता असते. श्वसन-रक्ताभिसरण यासारख्या अखंडपणे चालणाऱ्या क्रियांचा क्रम विशिष्ट नियोजनबद्ध पद्धतीनेच व्हावा लागतो. रोगप्रतिकारक शक्ति तयार करणे हे देखिल प्रथिनांचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मानवी शरीराला प्रथिनांची सतत गरज लागते.
विविध कडधान्ये-डाळी-दूध-अंडी-मासे-मांस हे प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश न्याहरीमध्ये करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर आणि घरातच उपलब्ध असलेली विविध धान्ये-भाज्या-फळे यांचा समावेश असलेल्या विविध पदार्थांचा समावेश तयार करून न्याहारीचे विविध पदार्थ महिलांना प्रदर्शित करून त्यांना खाण्यासाठीही देण्यात आले. नाचणीचे सत्व, बिना तांदळाची नाचणीची इडली, वरीचा गोड शिरा, मिश्र कडधान्यांची कोशिंबीर, मिश्र आदिम धान्यांच्या भाजणीचे तवसं घालून थालीपीठ आणि मिश्र डाळींची वाटली वाटली डाळ असे विविध पदार्थ तयार करून महिलांना त्यातील पोषण मूल्याबद्दल महिलांशी संवाद साधला. कुपोषण आणि त्याअनुषंगाने होणारे महिलांचे आजार याबद्दल मुंबईतील के.इ.एम. हॉस्पिटल येथिल वैद्यकीय समाज विकास अधिकारी श्री. विजय जावळेकर यांनी माहिती दिली. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथिल महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. मीरा काळे यांनी आहारातील प्रथिनांची गरज का असते आणि ती कशी पूर्ण करावी याबाबत महिलांशी संवाद साधला. सृष्टीज्ञानच्या श्रीम. संगीता खरात यांनी कोरोना सारखे साथीचे आजार असो किंवा हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम असो, आहारातून रोगप्रतिकारक शक्ति कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले.
ही एक सुरुवात असून या भागातील महिलांच्या आरोग्यविषयक कामाची नांदी ठरेल असा विश्वास या निमित्तानी आम्हाला मिळाला. या कार्यक्रमाची पूर्व तयारी तसेच यशस्वी आयोजनामध्ये श्री. कुणाल अणेराव, श्रीम. शरयू दळवी, श्रीम. शुभांगी बेलवलकर, श्रीम. भाग्यश्री नाईकवाडे आणि श्रीम. मानसी अणेराव यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
May be an image of one or more people and people standing
May be an image of text that says 'Eat Smart Right From The Start न्याहारी उत्तम -आरोग्य सर्वोत्तम विजय शं. करंबेळे विभाग अध्यक्ष केशव करं शाखाध्यक्ष realme parag TShyara_anerdo3 anerao'
May be an image of text that says 'हवामानपूरक सकस रोगप्रतिकारक आहार अभियान Climate-friendly Nutritious Immunity-boosting -boosting Food Campaign Eat Smart Right From The Start न्याहारी उत्तम आरग्य सवोतम सत्यम'
May be an image of food and indoor