Donation
Recent Events

शेती करणाऱ्या महिलांचे आरोग्य

Published on August 17, 2022 under Uncategorized
शेती करणाऱ्या महिलांचे आरोग्य
शेतीची बरीचशी कामे ओणव्याने वाकून, चवड्यांवर बसून करावी लागतात. त्यामुळे महिलांना पाठीची, कमरेची तसेच गुढगेदुखी यासारखे आजार होत असतात. त्याच बरोबर स्त्री म्हणून गर्भाशयाचे आणि पाळीचे विकारही या स्त्रियांना भेडसावत असतात. यावर उपाय म्हणून शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला या पस्तीस वर्षे वय झाल्यानंतर सरसकट गर्भाशय काढून टाकतात असे निरीक्षण आहे. शेतीच्या कामात विळे, कोयते, कुदळी यासारख्या अवजारांचा वापर होतो. त्यांचा वापर करत असताना प्रसंगी जखमा होऊ शकतात. कडक ऊन-थंडीवारा आणि पाऊस झेलत शेतीची कामे महिला करत असल्याने त्वचा विकार, सर्दी-खोकला-ताप यासारख्या आजारांना वारंवार सामोरे जावे लागते. त्याच बरोबर सकस अन्नाचा अभाव आणि जोडीला उपास-व्रत-वैकल्ये यामुळे कुपोषण होऊन या महिला रक्तक्षयारख्या आजाराला बळी पडतात. अशी दुखणी अंगावर काढत शेतकरी महिला पुरुषांच्या बरोबरीने १२ ते १४ तास शेतात राबत असतात.
अशा परिस्थितीत त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत राहाते आणि त्या कोणत्याही आजाराला पटकन बळी पडू शकतात. सध्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला गेली दोन वर्षे ग्रासले आहे. पण याआधी आणि नंतरही आपल्या आरोग्याला असलेला मोठा धोका म्हणजे हवामान बदल. हवामान बदल म्हणजे उष्णता रोखून धरणाऱ्या कार्बन, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड यासारख्या वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. त्यामुळे वातावरणात पराकोटीचे बदल होऊन पृथ्वीवर विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
हवामान बदल म्हणजेच वाढते तापमान, किटकांची वाढ, पावसाची अनिश्चितता, पाण्याची कमी उपलब्धता या साऱ्या आव्हानांना तोंड देताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती कोलमडून पडली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे एक सर्वमान्य सत्य आहे की जेव्हा कोणतीही नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती घडते तेव्हा त्यात बळी जणाऱ्यांमध्ये गरीब लोक, महिला आणि लहान मुले यांचाच मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) द्वारे नमूद केल्याप्रमाणे, हवामान बदलांच्या परिणामांचा जास्त भार हा मुख्यत: स्त्रिया विशेषत: गरिब स्त्रियांवर पडलेला दिसतो. जगातील अल्पभूधारक शेतकरी या बहुसंख्य महिला आहेत, आणि म्हणूनच हवामानाशी संबंधित शेतीतील आव्हानांचा सामना करताना स्त्रियांची उपजीविका धोक्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून पुन्हा गरीबी आणि आरोग्याच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. प्रसंगी अशा आपत्ती पश्चात स्थलांतर करण्याची वेळ अशा महिलांवर येते. शहरात मजुरी करण्यासाठी आलेल्या स्त्रिया या हवामान बदलाच्या परिणाम स्वरूप आलेल्या आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही की त्यांची कोठे नोंदणी होते.
गेली पाच वर्षे सृष्टीज्ञान ही संस्था देवरुख परिसरातील विविध गावांमध्ये हवामान बदल विषयक जाणीव जागृतीचे कार्यक्रम करत आहे. त्यावेळेस या भागातील महिला, तरुणी यांच्यातील कुपोषणाची समस्या पुढे आली होती. आहार घेताना केवळ अन्न सुरक्षाच नव्हे तर त्या अन्नातून पोषण सुरक्षा मिळणे ही मूलभूत मानवी गरज आहे. या उद्देशाने कुपोषणाशी संबंधित समस्यांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी गेल्या वर्षभरात या गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यात मुख्यत: शेतकरी महिला, पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या माता आणि पाच वर्षांखालील बालके यांच्यावर वर देखील लक्ष केंद्रित केले होते. २०२१ च्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम “सुयोग्य आहाराची सुरुवात, एका वर्षाच्या आत” अशी होती, त्याच चालीवर “सकस न्याहरीने दिवसाची सुरुवात, एका तासाच्या आत” ही संकल्पना घेऊन आम्ही कार्यक्रमांचे नियोजन केले. त्यानुसार आपल्या गावातील महिलांसाठी “हवामान पूरक, सकस आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविणारी न्याहारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यातही या न्याहरीतील पदार्थ प्रथिने केंद्रित अन्न-धान्यांपासून बनवलेले होते. आपला आहार हा मुख्यत: कर्बोदक केंद्रित आहे. म्हणजे चपाती-भाकरी-भात जास्त प्रमाणात आणि भाजी-डाळ कमी प्रमाणात. महिला शेवटी जेवत असल्याने त्यांना तसाही भाजी-डाळीतील अत्यल्प वाटा मिळतो. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि पुनः कार्यरत होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती प्रामुख्याने प्रथिनांमधून मिळत असते. त्याव्यतिरिक्त शरीरातील अन्नाचे पचन, पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, रोगप्रतिकारक शक्ति यासारख्या क्रिया वेगाने व्हाव्यात यासाठी काम करणाऱ्या एन्झाईम्ससाठी प्रथिनांची आवश्यकता असते. एका उत्साह वर्धक दिवसाची सुरुवात ही नेहमी पोषक आणि सकस न्याहारीने होत असते. अशी न्याहारी जी संपूर्ण दिवसभर काम करण्याची ताकद तुम्हाला देऊ शकते. म्हणूनच सकाळी उठल्यावर एका तासाच्या आत अशी सकस न्याहरी करणे आवश्यक असते. पण महिला सकाळी पाच वाजल्यापासून विविध कामांमध्ये अशा पद्धतीने व्यस्त असतात की त्यांचे स्वत:च्या न्याहरीकडे दुर्लक्ष होत राहाते. भूक मारण्यासाठी चहा मोठ्या प्रमाणावर प्यायला जातो किंवा तंबाखू सारख्या व्यसनाला जवळ केले जाते. त्यामुळे आम्ल-पित्त वाढते, स्वभाव चिडचिडा होतो. महिलांमधील कुपोषण वाढत जाते. याबाबत महिलांमध्ये जागृती करण्यासाठी स्थानिक उपलब्ध पदार्थ वापरुन सकस आणि ताजे न्याहारीचे विविध प्रकार कसे बनवावेत यांच्या प्रात्यक्षिकांसह हा कार्यक्रम आयोजित केले गेले.
स्थानिक पातळीवर आणि घरातच उपलब्ध असलेली विविध धान्ये-भाज्या-फळे यांचा समावेश असलेल्या विविध पदार्थांचा समावेश तयार करून न्याहारीचे विविध पदार्थ महिलांना प्रदर्शित करून त्यांना खाण्यासाठीही देण्यात आले. नाचणीचे सत्व, बिना तांदळाची नाचणीची इडली, वरीचा गोड शिरा, मिश्र कडधान्यांची कोशिंबीर, मिश्र आदिम धान्यांच्या भाजणीचे तवसं घालून थालीपीठ आणि मिश्र डाळींची वाटली डाळ असे विविध पदार्थ तयार करून महिलांना त्यातील पोषण मूल्याबद्दल महिलांशी संवाद साधला. कुपोषण आणि त्याअनुषंगाने होणारे महिलांचे आजार याबद्दल मुंबईतील के.इ.एम. हॉस्पिटल येथिल वैद्यकीय समाज विकास अधिकारी श्री. विजय जावळेकर यांनी माहिती दिली. तसेच महिलांचे पाळी तसेच गर्भाशय विषयक आजार याबद्दल डॉ. कामाक्षी भाटे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथिल महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. मीरा काळे यांनी आहारातील प्रथिनांची गरज का असते आणि ती कशी पूर्ण करावी याबाबत महिलांशी संवाद साधला. सृष्टीज्ञानच्या श्रीम. संगीता खरात यांनी कोरोना सारखे साथीचे आजार असो किंवा हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम असो, आहारातून रोगप्रतिकारक शक्ति कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले.
देवरुख परिसरातील वीस गावांमध्ये आठशेच्या वर महिलांशी संवाद साधण्यात संस्था यशस्वी झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो.
May be an image of 12 people, child, people sitting, people standing and indoor
May be an image of 10 people, child, people sitting, people standing and indoor
May be an image of 15 people, people standing and outdoors
May be an image of 11 people and people standing