कोकणातील कृषि परंपरा – अक्षय तृतीया – आळे घालणे
अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा अक्षय्य – उंदड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो. कोकणात या दिवशी बीज पूजन करून परस बागेत आळे करून लावायच्या बियाणांची मुख्यत: घेवडा, दोडका, घोसाळी अशा भाज्यांच्या बियाणांची पेरणी केली जाते. कोकण हा भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे. त्यामुळे एकदा पावसाळा सुरू झाला की नुस्ता चिखल होऊन जातो. अशावेळी बियाणी रुजण्यासाठी आवश्यक भुसभुशीत पणा मिळत नाही तसेच आळेही टिकत नाहीत. म्हणून पाऊस सुरू होण्या पूर्वीच बियाणी रुजवली आणि आळी तयार केली तर मोठ्या पावसात त्यांची तग धरून ठेवायची क्षमता वाढलेली असते. या परंपरेला अनुसरून सृष्टीज्ञान संस्थेने सह्याद्री संकुल, आंगवली येथे परस बागेची सुरुवात आळी घालून केली. घेवडा, लाल भोपळा, अबई यांच्या बिया आळे करून लावण्यात आल्या.
यावेळी आंगवली गावामध्ये गेली पंचवीस वर्षे भाज्यांची लागवड करणाऱ्या श्रीम. दीपिका बंडागळे यांचा सरपंच श्रीम. अरुणा अणेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. प्रताप नाईकवाडे (ए. एस. पी. कॉलेज, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) तसेच ए. एस. पी. महाविद्यालयात शाश्वत शेतीचा अभ्यासक्रम चलविणारे सह-प्राध्यापक डॉ. सोनल क्षीरसागर, श्री. प्रथमेश लिंगायत आणि शाश्वत शेतीचा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीही उपस्थित होते.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू केलेली ही सेंद्रिय परस बाग ही पुढे जाऊन कुटुंबियांची पोषण बाग ठरेल असा विश्वास आहे.


