जीवांमृत बनवण्याची कार्यशाळा
सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जीवांमृत बनवण्याची कार्यशाळा मंगळवार दिनांक 3 मे 2022 रोजी आंगवली गावात आयोजित करण्यात आली होती. हवामानात होणारे तीव्र बदल हे शेती उत्पादनावर मोठा परिणाम करत आहेत. अशावेळी पिकांना तगून राहण्यासाठी ताकद मिळावी म्हणून आपल्या आसपास उपलब्ध असलेली पाने, फळे, तसेच शेण आणि गोमूत्र यारख्या विविध घटकांचा वापर करून विविध अर्क तयार करता येतात. त्यामुळे वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्ति वाढते, पाने आणि फळे तजेलदार होतात तसेच उत्पादनात वाढ होते. यातील एक महत्त्वाचे वनस्पतींचे टॉनिक म्हणजे जीवांमृत होय. जीवांमृत म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे आहेत आणि ते कशा प्रकारे वापरावे याचे मार्गदर्शन मान्यवर वक्ते डॉ. प्रताप नाईकवाडे (ए. एस. पी. कॉलेज, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) यांनी केले. तर ए. एस. पी. महाविद्यालयात शाश्वत शेतीचा अभ्यासक्रम चलविणारे सह-प्राध्यापक डॉ. सोनल क्षीरसागर आणि श्री. प्रथमेश लिंगायत यांनी जीवांमृत कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. जीवांमृताला लागणारे साहित्य, त्याचे प्रमाण तसेच ते का घालायचे असते ही सारे त्यांनी व्यवस्थित समजावले. या कार्यशाळेत आंगवली गावच्या सरपंच श्रीम. अरुणा अणेराव, शेतकरी महिला तसेच युवक यांनी उत्सुकतेने या कार्यशाळेत सहभाग घेतला आणि अनेक प्रश्न विचारले. ही कार्यशाळा यशस्वी व्हावी यासाठी सृष्टीज्ञान संस्थेचे कार्यकर्ते तसेच ए. एस. पी. महाविद्यालयात शाश्वत शेतीचा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी यांनी परिश्रम केले.
अक्षय तृतीयेच्या दिवशी शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेले हे पाऊल असेच पुढे चालत राहील आणि अधिक लोकांपर्यंत हे ज्ञान घेऊन जाऊ असा विश्वास या कार्यशाळेने दिला आहे.



