Donation
Recent Events

वसुंधरेच्या लेकी शेतकरी महिला गौरव मेळावा

Published on August 17, 2022 under Uncategorized
वसुंधरेच्या लेकी शेतकरी महिला गौरव मेळावा
विसाव्या शतकात जगभरातील विविध महिलांनी त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या वर्षाच्या महिला दिनाची थीम होती “शाश्वत उद्यासाठी आज समानता” हवामान बदल या समस्येला समजून घेऊन ज्या महिलांनी त्यावर उपाययोजना शोधल्या आहेत आणि समाजाचे नेतृत्व केले आहे अशा महिलांचा गौरव केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट्राचे कृषि मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांनी २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष असेल असे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर आंगवली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या गावात शेतकरी महिलांचा मेळावा आयोजित केला होता. सृष्टीज्ञान संस्था, मुंबई; सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख आणि ASP महाविद्यालय, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात १५०च्या वर शेतकरी महिला सहभागी झाल्या होत्या.
हवामानात होणारे तीव्र बदल गेल्या वर्षात कडक उन्हाळा, निसर्ग चक्रीवादळ, जुलै महिन्यात आलेला पूर, कोसळलेल्या दरडी आणि डिसेंबर पर्यन्त ठाण मांडून बसलेला पाऊस अशा विविध रूपात आपल्याला भीषण पद्धतीने अनुभवायला मिळाले. कोकणातील अशा प्रतिकूल वातावरणातही निश्चयाने शेती करणाऱ्या महिला या खऱ्या अर्थाने वसुंधरेच्या लेकी आहेत. या परिसरातील महिला शेतीमध्ये कोणत्या प्रकारचे नवीन प्रयोग करत आहेत, शेतीच्या कोणत्या परंपरा जपत आहेत याबाबत एकमेकींशी चर्चा करण्याची संधी या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांना मिळाली. आंगवली पंचक्रोशीतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जसे की सेंद्रिय पद्धतीने नाचणी, भाजीपाला लागवड शेतकरी महिला, देशी शेळी तसेच गो पालन करणाऱ्या महिला, गांडुळ खत तयार करणारे बचत गट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका आणि माजी अध्यक्षा श्रीम. युगांधरा राजेशिर्के या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. बांबूची रोपे लावून या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर शाश्वत विकासाच्या वाटा दाखवणाऱ्या लोकसंवाद पोस्टर मालिकेचे उद्घाटनही करण्यात आले. आंगवली गावच्या सरपंच श्रीम. अरुणा अणेराव यांनी पाहुण्या तसेच सर्व उपस्थितांचे स्वागत केले. श्रीम. संगीता खरात यांनी प्रास्ताविक केल्यानंतर ASP महाविद्यालय, देवरुख येथिल महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. मीरा काळे यांनी गेल्या वर्षभरात महिला शेतकऱ्यांबरोबर कोणकोणते उपक्रम राबवविले याचा अहवाल सादर केला. तर वसुंधरेच्या लेकी अभियानच्या प्रमुख निमंत्रक श्रीम. ज्योती खोपकर यांनी या अभियानाची माहिती दिली. या कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकरी महिलांना त्याचे सदस्यत्व देण्यात आले. शेतकरी महिलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी वसुंधरेच्या लेकी अभियान सुरू करण्यात आले. शेतकरी आणि शेतमजूर महिला यांची समृद्धी हेच वसुंधरेच्या लेकी अभियानाचे मुख्य ध्येय आहे. ज्या महिला सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करू इच्छित आहेत त्यांना त्याबाबत माहिती आणि प्रशिक्षण द्यावे, त्यांना एकमेकींशी संवाद साधून अनुभवांची देवाण-घेवाण करता यावी या उद्देशाने या अभियानाची सुरुवात झाली आहे.
प्रमुख पाहुण्या श्रीम. युगांधरा राजेशिर्के यांनी त्यांच्या भाषणात सर्व महिलांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे केवळ शेती पुरते मर्यादित न राहाता शेतमाल प्रक्रिया करणे, आर्थिक नियोजन, आजार आणि आहार व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास यासारख्या प्रशिक्षणामधून एक परिपूर्ण शेतकरी महिलेच्या रूपात सर्वांना सामोरे जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम. शुभांगी बेलवलकर, श्रीम. मानसी अणेराव, श्रीम. अंकिता जाधव, श्री. पराग अणेराव आणि कुणाल अणेराव यांनी श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड परिश्रम केले.
गेल्या दोन वर्षातील कोरोना विषाणूची महामारी, पूर आणि दरड्ग्रस्त परिस्थितीत निर्माण झालेल्या नैराश्यातून हा कार्यक्रम महिला शेतकऱ्यांना आणि आम्हालाही आशावादी दृष्टीकोन देऊन गेलाय हे
नक्की!
May be an image of 3 people, people standing and outdoors
May be an image of 6 people, people standing and text that says 'वसुंधरेच्या लेकी बेतकरी महिला गੈਰ मेळावा मंगळवार, दि मार्च 2੦੨2, อ पर्यंत स्थळ: आंगवन मधली वाडी, पाहुण्या'
May be an image of 6 people and people standing
May be an image of 3 people, people standing and outdoors
May be an image of 4 people and people standing